प्रभात वृत्तसेवा आंबेठाण – खेड तालुक्यातील वाजवणे (ता. खेड) या शांत गावाने आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. मुंबई शहराच्या जगप्रसिद्ध डबेवाला सेवेला शिस्त, शून्य-चूक पद्धती आणि पर्यावरणपूरक कार्यपद्धतीची भक्कम पायाभरणी करणारे आद्य मार्गदर्शक स्व. महादू हावजी बच्चे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येत असलेल्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सुमारे 125 वर्षांच्या परंपरेला वाहून नेणार्या मुंबई डबेवाल्यांची सेवा आज थेीश्रव’ी इशीीं ङेसळीींळली चेवशश्र म्हणून ओळखली जाते. स्व. महादू हावजी बच्चे यांनी स्थापन केलेल्या मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्या माध्यमातून संघटित शिस्त, सामूहिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवण्यात आला. धर्मशाळा, अन्नछत्र, रोटी बँक, पर्यावरण उपक्रम यांसह सामाजिक कार्याची परंपरा आजही सुरू आहे. डबेवाल्यांच्या सेवेवर आजवर 700 हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची नोंद आहे, तर प्रिन्स चार्ल्स व रिचर्ड ब्रॅन्सन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या व्यवस्थेची दखल घेतली आहे. या सोहळ्यास प्रामुख्याने आमदार श्रीकांत भारतीय, आमदार बाबाजी शेठ काळे, जि. प. सदस्य अतुल भाऊ देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील, इंजि. दिलीप शेठ मेदगे, माजी संचालक कात्रज दूध संघ शेखर भाऊ शेटे, संचालक अरुण शेठ चांभारे, माजी जि. प. सदस्य जयसिंग शेठ भोगाडे, भोसरीचे माजी नगरसेवक रवी भाऊ लांडगे, उद्योगपती किरण शेठ मुके, तसेच मुंबई डबेवाल्यांचे अध्यक्ष उल्हास मुके, मंडळ अध्यक्ष रामदास करवंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक ढोल-ताशे, लेझीम, दिंडी आणि हरिनामाच्या गजरात स्मारक भूमिपूजन पार पडताच गावभर उत्साहाचे वातावरण पसरले. स्थानिक तरुणांनी आणि महिलांनी मोठ्या सहभागातून कार्यक्रमाला सामाजिक साज चढवला.गावातील सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग, पारंपरिक वाद्यांचा जल्लोष आणि डबेवाल्यांच्या सेवा परंपरेचा गौरव-या सर्वामुळे हा सोहळा केवळ भूमिपूजन न ठरता एक ऐतिहासिक, भावनिक आणि प्रेरणादायी पर्व ठरला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन डबेवाल्यांच्या प्रतिनिधींनी केले. स्मारक हे प्रार्थनेचे स्थळ व्हावे – आमदार भारतीय आपल्या भाषणात आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले, हे स्मारक केवळ प्रेक्षणीय न राहता डबेवाल्यांच्या मूल्यांची प्रेरणा देणारे प्रार्थनेचे आणि श्रधेचे स्थान व्हावे. त्यांच्या घरांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.