प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – खेड तालुक्यातील कोहिंडे बुद्रुक येथील श्रीक्षेत्र कुंडेश्वर मंदिर परिसराला पुरातन कालीन स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली असून, त्याअंतर्गत सुमारे 6 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मोहिते पाटील म्हणाले की, कुंडेश्वर, चक्रेश्वर, शंभू महादेव मंदिर, भामेश्वर ही गिरीस्थाने असून, या सर्व मंदिरांना पुरातन काळापासून धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच सिद्धेश्वर, काळेश्वर, शैनेश्वर व सोमेश्वर ही जमिनीवर असलेली भगवान शंकराची हेमाडपंथीय मंदिरे असून, त्यांची स्थापत्यरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. या ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे जतन व्हावे, या दृष्टीने श्री क्षेत्र कुंडेश्वर परिसराचा विकास पुरातन कालीन स्वरूप जपणार्या पद्धतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या विकासकामांत दोन दीपमाळांची उभारणी, नेवासा दगडातील पायर्या, दगडी रस्ता, दगडी फरशी ब्लॉक्स, संरक्षक भिंत (कंपाउंड) आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय, श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे सुमारे 3 कोटी रुपये खर्चून रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे घडलेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमास पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, कुंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सखाराम खेंगले, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, पश्चिम विभाग अध्यक्ष अमोल पाणमंद, देवस्थानचे खजिनदार संजय रौंधळ, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष हिरामण रौंधळ, संचालक लक्ष्मण घोलप, भीमाजी कचाटे, आनंदराव कचाटे, संभाजी कुडेकर, सत्यवान पाणमंद, रामदास खेंगले, चिंतामण शिंदे, बबन शिंदे, पांडुरंग बच्चे, देवतोरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती शिंदे, चेअरमन अनिल डांगले, पंडित रौंधळ, विजय करंडे, रामदास सावंत, हिरामण कंद, सत्यवान वाळुंज, अतुल आहेरकर, सौरभ कोळेकर, माजी सरपंच मंगल भांगे, राजश्री ढोरे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास खेंगले यांनी केले तर गणेश आहेरकर यांनी आभार मानले. पाईट गणातून पल्लवी दरेकर याच कार्यक्रमात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पाईट पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पल्लवी जयसिंग दरेकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली. जयसिंग दरेकर हे प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते असून, त्यांच्या माध्यमातून परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागल्याचे मोहिते पाटील यांनी नमूद केले.