प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – खेड तालुक्यातील होलेवाडी-निमगाव खंडोबा या सात किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. दोन फुटांपेक्षा अधिक खोल खड्ड्यांमुळे वाढलेल्या अपघातांची शक्यता आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारी यांची आमदार बाबाजी काळे यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन दिवसांत खड्डे बुजवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या.आमदारांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कामाला सुरुवात केली आहे. रविवारी (दि. ७) आमदार काळे यांनी स्वतः होलेवाडी-निमगाव रस्त्यावर उपस्थित राहून खड्डेबुजवणीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामाच्या दर्जाची तपासणी केली. नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी रस्त्याची दुरुस्ती तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.पावसाळ्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांची स्थिती अधिक गंभीर झाली होती. खरपुडीचे सरपंच व बाजार समिती संचालक जयसिंग भोगाडे यांनी स्वखर्चातून तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र, कायमस्वरूपी उपायाची मागणी होती. आमदार काळे यांनी प्रशासनाला निर्देश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. निमगाव खंडोबा या देवस्थानाकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने रस्त्याची दुरुस्ती आवश्यक होती. या तत्पर हस्तक्षेपाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.