प्रभात वृत्तसेवा महाळुंगे इंगळे – श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे नूतन प्रशासकीय ग्रामपंचायत इमारत तसेच नूतन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारतीचे उद्घाटन खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.खेड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतीची जुनी इमारत मोडकळीस आली होती. त्या जागी उभारण्यात आलेली नवी प्रशासकीय ग्रामपंचायत इमारत ही खेड तालुक्यातील उत्कृष्ट व सुसज्ज ग्रामपंचायत इमारतींपैकी एक असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी सांगितले. स्व. शामराव शंकरराव इंगळे इनामदार यांच्या जागा सौजन्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी आकर्षक व सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उत्तम सुविधा उपलब्ध झाल्या असून शैक्षणिक वातावरणाला चालना मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिदास तुपे यांनी केले. त्यांनी गट-तटाचे राजकारण न करता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. विद्यमान सरपंच अर्चना मुकुंद महाळुंगकर यांनी आपल्या मनोगतात गावातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत प्रत्येक नागरिकाला मुबलक पाणी मिळावे, अशी विनंती आमदार बाबाजी काळे यांना केली. शिवसेनेचे नेते शिवाजी वरपे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह पुणे जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी रामदास धनवटे, गणेश नाणेकर, अमोल पवार, जीवन खराबी, संदीप सोमवंशी, सरपंच अर्चना मुकुंद महाळुंगकर, उपसरपंच किशोर विष्णू भालेराव, मयुरी प्रताप महाळुंगकर (माजी सरपंच, सदस्या), वैशाली दिनकर महाळुंगकर (माजी सरपंच, सदस्या), मंगल राजेंद्र भोसले (माजी सरपंच),ग्रामपंचायत अधिकारी बापु बबन गोरे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.