प्रभात वृत्तसेवा चिंबळी – खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार शितल येंळवडे व कुरूळी पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार सुरेखा गवारे यांचा चिंबळी येथे गावभेट दौरा पार पडला. दौऱ्याची सुरुवात श्रीकाळभैरवनाथ मंदिर आणि पद्मावती मंदिरात श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उमेदवारांनी चिंबळीसह वाडीवस्तीवर जाऊन मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे निघोजे गावचे उपसरपंच तथा खेड तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येंळवडे आणि मोई गावचे माजी सरपंच राहुल गवारे यांनी सांगितले. मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील या उमेदवारांना गावातील जेष्ठ नागरिकांनी आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मोई, चिंबळी आणि निघोजे गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित सर्व ग्रामस्थांनी या दोन्ही उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यामुळे आळंदी ग्रामीण गटात राजकीय वातावरण अधिक सक्रिय झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.