Junnar: पिंपळवंडी — शिवजन्मभूमी म्हणून ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण नाराजीच्या वातावरणात पार पडल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला असून, लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनावरून व निमंत्रण प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. Junnar: पिंपळवंडी प्रवेशद्वाराचे नाराजीच्या छायेत लोकार्पण; जुन्नर नगरपरिषदेच्या नगरसेवकांना निमंत्रण नसल्याची खंत छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना अठरा पगड जाती, सर्वधर्म समभाव आणि समानतेचा आदर्श ठेवला होता. मात्र पिंपळवंडीतील या लोकार्पण सोहळ्यात काही घटकांना वगळण्यात आल्याने अनेकांच्या भावना दुखावल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर जबाबदारी निश्चित होण्याची मागणीही पुढे येत आहे. Junnar दरम्यान, या प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेला अश्वारूढ पुतळा जुन्नर शहरातून आणण्यात आला आहे. सन २०२१ मध्ये जुन्नर नगरपरिषदेने ठराव मंजूर करून पिंपळवंडी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार हा पुतळा सुपूर्द केला होता. मात्र, प्रवेशद्वाराच्या अनावरण सोहळ्यासाठी जुन्नर नगरपरिषदेचे आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक किंवा प्रशासकीय अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याची खंत माजी नगराध्यक्ष श्याम पांडे आणि उपनगराध्यक्ष सुनील मेहेर यांनी व्यक्त केली. याचबरोबर, गावाच्या विकासासाठी भरीव योगदान देणारे स्वर्गीय मारुतीशेठ आबाजी लेंडे यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्यात आले असले तरी त्यांच्या कुटुंबीयांनाही पूर्वकल्पना न देता ऐनवेळी निमंत्रण देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनाबाबत स्थानिक पातळीवर नाराजीचे सूर उमटत आहेत.