Junnar Election – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने जुन्नर तालुक्यात उद्या, ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्यातील ८ जिल्हा परिषद विभाग आणि १६ पंचायत समिती गणांसाठी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल. या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण ३ लाख ७ हजार २६० मतदार असून, प्रशासनाने ३६६ मतदान केंद्रे सज्ज केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी दिली आहे.मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण २३९६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच ३५ क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज, ६ फेब्रुवारी रोजी श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या यात्री निवास येथे ३५ टेबलांच्या माध्यमातून मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदान संपल्यानंतर याच ठिकाणी साहित्य जमा करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांनी सांगितले. या निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारी सकाळी १० वाजता लेण्याद्री येथील यात्री निवास भाग क्र. २ येथे होणार आहे. मतमोजणीसाठी ३२ टेबल आणि टपाली मतपत्रिकांसाठी ८ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व जिल्हा परिषद गटांची मोजणी एकाच वेळी सुरू होणार असून १५ फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाला कडक सूचना देण्यात आल्या असून पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.