प्रभात वृत्तसेवा जुन्नर – जुन्नर नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष आणि २० नगरसेवक पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. शहरातील नऊ शाळांच्या इमारतींमध्ये २५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, २३,४९१ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम यांनी दिली.आज (दि. २) सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवडणुकीसाठी ११,८०१ पुरुष आणि ११,६९० महिला मतदार आहेत. हे सर्व मतदार एका नगराध्यक्ष आणि १० प्रभागांमधून २० नगरसेवक निवडणार आहेत. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी १५० मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच, शहरातील दोन ठिकाणी मतदान सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले असून, सर्व मतदान केंद्रांच्या परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी व्हील चेअर, रॅम्प, पिण्याचे पाणी आदी सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चरण कोल्हे यांनी केले आहे. दरम्यान, आज झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवारी (दि. ३) सकाळी दहापासून पंचायत समिती सभागृहात सुरू होणार असून, दहा प्रभागांची मतमोजणी दोन ते तीन फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.