प्रभात वृत्तसेवा जेजुरी – पुरंदर तालुक्यातील अनेक गावत बिबटयाचा वावर वाढला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला पिंजऱ्यांची आवश्यकता होती. जेजुरीजवळील कोळविहिरे येथील किर्लोस्कर फेरस कंपनी मार्फ़त वनविभागाला सहा लाखांचे पाच पिंजरे तयार करून देण्यात आले.पुरंदर तालुक्यातील मांढर, परिंचे, कोडीत, बुद्रुक, वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, जेजुरी, मांडकी, झेंडेवाडी, नारायणपूर, कोळविहिरे, नाझरे या भाागात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्या मानवी वस्तीत येणे, बिबट्यामार्फत पाळीव प्राणी, भटके कुत्रे यांच्यावर हल्ले होणे, शेतीची कामे करताना शेतकऱ्यांना बिबट्या दिसणे, औद्योगिक क्षेत्रात बिबट्याचा वावर वाढणे अशा घटना दररोज घडत आहेत.बिबटयांना पकडण्यासाठी वनविभागाला पिंजऱ्याची आवश्यकता होती. त्यांची गरज ओळखून व नागरीकांच्या हितासाठी कोळविहिरे येथील किर्लोस्कर फेरस कंपनीने पाच पिंजरे बनवून देण्याचा निर्णय घेतला. तयार झालेले पिंजरे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले. वनविभागाच्यावतीने हे पिंजरे बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात बसविण्यात येणार असल्याचे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले, वनपाल गणेश पवार, राहुल रासकर, वनपाल दीपाली शिंदे, किर्लोस्कर फेरस कंपनीचे जेजुरी यांच्यामार्फत कंपनी प्रमुख सत्यमूर्ती, जब्बार पठाण, प्रवीण पवार, सागर झोपे, सूरज भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते. बिबट प्रवण क्षेत्रात काळजी घ्यावीट्या बिबट्या प्रवण क्षेत्रात वावरताना लहान मुले यांना एकटे सोडू नये, शेतीची कामे करताना शेतामध्ये रात्रीच्या वेळी जाताना समूहात जावे, एकत्र काम करावे, सोबत मोबाइलवर गाणे सुरू ठेवावे, जोरात बोलत कामे करावीत, आपली पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यात ठेवावीत, घराभोवती रात्रभर दिव्याचा उजेड राहील, याची काळजी घ्यावी, तसेच घराभोवती भटके कुत्रे येऊ नये याची काळजी घ्यावी, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी दिली.