प्रभात वृत्तसेवा जेजुरी – स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, थोर समाजसुधारिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपाध्यक्ष गणेश निकुडे यांच्या हस्ते नगरपरिषद कार्यालयात प्रतिमापूजन करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक पै. कृष्णा कुदळे, योगेश जगताप, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रमेश लेंडे, भगवान डिखळे, पंढरीनाथ जाधव, गौतम भालेराव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगराध्यक्ष बारभाई म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणास्रोत असून १७७ वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना अनेक कर्मठ-अनिष्ठ, जुन्या रूढी परंपरेच्या विरोधात लढा देणाऱ्या फुले दाम्पत्याने नवा इतिहास घडविल्यानेच आजच्या आधुनिक व यांत्रिक युगात प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रभागी आहेत. त्याचे सर्व श्रेय हे फुले दाम्पत्याला जाते. त्यांच्या कार्याचा आदर्श संपूर्ण देशाने घेतला आहे. सर्व घटकांतील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य केले आहे. त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सर्व महिला कृतज्ञता व्यक्त करतात.