प्रभात वृत्तसेवा जेजुरी – जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर (दि.१५) नगरपालिका सभागृहात घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदी गणेश मच्छिंद्रनाथ निकुडे यांची तर स्वीकृत नगरसेवक पदी रामकृष्ण (समीर) मोरे, परशुराम (प्रशांत) लाखे यांची एकमताने निवड केली.पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष जयदीप बारभाई तर निवडणूक निर्णय अधिकारी परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी काम पाहिले. नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) चे नगराध्यक्षपदासह १७ नगरसेवक व नगरसेविका निवडून आले आहेत. १ अपक्ष तर २ भाजपचे सदस्य आहेत. सलग चौथ्यांदा निवडून आलेल्या गणेश निकुडे यांनी राष्ट्रवादीची बांधणी करत समाजातील विविध घटकांना पक्षाच्या प्रवाहात आणत उमेदवारी देत सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न करीत जेजुरी नगरपालिकेत निर्विवाद बहुमत मिळवण्यात मोलाची कामगिरी केली. त्यामुळे त्यांना पुन्हा उपनगराध्यक्षपदाची संधी देण्यात आल्याचे बोलले जाते. मागील पाच वर्षे त्यांनी सलग उपनगराध्यक्षपद भूषवले आहे. तर बहुमतामुळे २ स्वीकृतपदे राष्ट्रवादीच्या पारड्यात आली. या पदावर मोरे, लाखे यांची वर्णी लागली आहे. यावेळी नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांच्यासह नगरसेवक योगेश जगताप, स्वप्नील हरपळे, शिवाजी जगताप,योगेश खोमणे, अस्लम पानसरे, गणेश डोंबे, तानाजी खोमणे, कृष्णा कुदळे, नगरसेविका भक्ती कोरपड, प्रज्ञा राऊत, अमिना पानसरे, मेघा उबाळे, स्नेहल भालेराव, स्वरूपा खोमणे, मोनिका घाडगे, योगिता दोडके, मंदा बयास, नीलम सातभाई, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रमेश लेंडे, युवक अध्यक्ष सनी झगडे, प्रचारप्रमुख संदीप जगताप, कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी, भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष करण्यात आला. अन्य कार्यकर्त्यांनाही संधी मिळणार निवडणुकीपूर्वी जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेमध्ये ज्या कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना स्वीकृत सदस्यपदाचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचे पालन होणार असून टप्या- टप्याने कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष रमेश लेंडे, प्रचारप्रमुख संदीप जगताप यांनी सांगितले.