प्रभात वृत्तसेवा जेजुरी – नुकत्याच पार पडलेल्या जेजुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निर्विवाद बहुमताने विजयी झालेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांच्यासह सुमारे १७ नगरसेवक, नगरसेविकांनी शुक्रवारी (दि.२६) नगरपरिषद कार्यालयात दाखल होत नियुक्ती पत्र स्वीकारले. लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विजयी सभेचे आयोजन करणार असल्याचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी यावेळी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी शीतल मुळे-भामरे यांच्या स्वाक्षरीने मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई, नगरसेवक गणेश निकुडे, शिवाजी जगताप, कृष्णा कुदळे, अस्लम पानसरे, स्वप्नील हरपळे, रोहित खोमणे, योगेश जगताप, नगरसेविका स्वरूपा खोमणे, अमिना पानसरे, मंदा बयास, मेघा उबाळे, प्रज्ञा राऊत, योगिता दोडके, नीलम सातभाई आदींनी नियुक्ती पत्रे स्वीकारली. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. लवकरच कार्यभार स्वीकारून कामकाजाला प्रारंभ करणार आहोत. राजकारण हे निवडणुकीपुरते असते.आता जनसेवक म्हणून कार्यरत राहणार आहोत. नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणे, त्यांच्या सुखदुःखात सामील होण्यासह विकासकामांना, स्वच्छता ,आणि नियोजित पाणीपुरवठा आदीना प्राधान्य देणार आहोत.