प्रभात वृत्तसेवा जवळार्जुन – जेजुरी येथे भंडाऱ्याच्या भडक्याने झालेल्या आगीत 16 नागरिक भाजले गेले होते. दुर्घटनेत 6 नागरिक गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर तत्काळ पुण्यातील सूर्या, नोबेल हॉस्पिटल येथे दाखल केले होते. जखमी नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून तातडीची व भरीव मदत देण्यात आली. महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीतून हातभार लावण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना सांगून स्वतः भरीव आर्थिक आणि वैद्यकीय मदत करीत सर्व भाजलेल्या नागरिकांना मानसिक व वैद्यकीय आधार दिला. अजित पवार यांनी स्वतः फोनवरून रुग्णांची विचारपूस करून डॉक्टरांना सर्व उपचार देण्याचे सांगितले. याबाबत नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यास वैद्यकीय मदत कक्षाचे अधिकारी महादेव मगर यांनी समन्वय साधत रुग्णांच्या उपचारासाठी विविध योजनांच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून विविध डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना उपचार देण्यासाठी मोलाची मदत केल्याची माहिती नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी दिली. जेजुरीतील आयुष्य हॉस्पिटलचे डॉ. अनिल कदम यांनी सर्व 16 रुग्णांवर एक दिवस मोफत उपचार केले. जयदीप बारभाई यांच्या वतीने औषधांचा खर्च देण्यात आला. नगराध्यक्ष बारभाई यांच्यामुळे जखमींना वेळेत मदत व उपचार उपलब्ध करून दिल्याने नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. जखमी रुग्णांना दिलासा जखमींमध्ये देवल बारभाई, विलास बारभाई, मोनिका घाडगे, राहुल घाडगे, मंदा खोमणे, रूपाली खोमणे, रजनी बारभाई, सई खोमणे आदींना उपमुख्यमंत्री पवार यांच्या वैद्यकीय कक्षाच्या मदतीने आठ महिन्यांत 1200 रुग्णांना 16 कोटी रुपयांची मदत दिली आहे. दररोज 30 ते 40 पेशंटला वैद्यकीय मदत कक्षाच्या साह्याने मदत केल्याची माहिती महादेवा वगैरे यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन, आरोग्य यंत्रणा, सामाजिक कार्यकर्त्यांनीही मदतीचा हात पुढे केला. उपमुख्यमंत्री पवार यांच्यामुळे वैद्यकीय मदत कक्षाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल जखमी नागरिक व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले असून उपचारांची प्रक्रिया सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले.