प्रभात वृत्तसेवा जेजुरी – जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणीचा मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. याचा नेमका फायदा कोणाला आणि तोटा कोणाला, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. मतदानाच्या टक्केवारीत लाडक्या बहिणींनी आपल्या भाऊरायासाठी मतदानरूपी दान कोणाला दिले, याची चर्चा पुरंदर तालुक्यात सुरू झाली आहे. जेजुरीमध्ये ७५८३ पुरुष, ८२१५ महिला व इतर २ (तृतीयपंथी), असे एकूण १५ हजार ८०० मतदार असून त्यापैकी २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानामध्ये ५८९५ पुरुष, तर ६४३६ महिला व इतर २ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष मतदारांपेक्षा सुमारे ५३९ महिलांचे मतदान जास्त आहे. मुळात जेजुरीनगरीमध्ये पुरुष मतदारांपेक्षा ६३२ महिला मतदारांची संख्या अधिक आहे. मागील काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचा आकडा जादा होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने सुरू केलेल्या “लाडकी बहीण ” योजनेचा मोठा फायदा महायुतीला मिळाला, असे चित्र निवडणूक निकालानंतर दिसून आले होते. सध्याची झालेली निवडणूक ही राजकीय गावपातळीवरील आहे. राज्यात सत्तेमध्ये असलेल्या महायुतीच्या घटक पक्षातील आपापसातील लढत आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फायदा नेमका कोणाला होईल, ही संभ्रमावस्था मतमोजणीपर्यंत कायम आहे. घड्याळाला मतदान जास्त की कमळ? शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण किती मते खातो, यावर ही गणिते अवलंबून आहेत. उद्योग, व्यवसाय नोकरीनिमित्त पूर्वी जेजुरीत निवासी असलेले परंतु गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळापासून बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. बहुतांश ठिकाणी दुबार नावेसुद्धा आहेत. मयत मतदारांची नावे सुद्धा मतदार यादीतून वगळली नाहीत. एकूणच मतदार यादी सदोष असून भविष्यात पुन्हा सर्व्हेक्षण करून मतदार यादी दुरुस्त करणे गरजेचे आहे. बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या मतदारांना शोधून त्यांचे मतदान करून घेताना उमेदवार अगदी मेटाकुटीला आले. हे मतदान सुद्धा कोणाच्या पारड्यात पडले, यावरूनच मताधिक्य अवलंबून आहे.