प्रभात वृत्तसेवा जेजुरी – जेजुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक शांततापूर्ण व सलोखा जोपासत एकमेकांशी गावगाड्याचे नाते जोपासत पार पडली. तरी १० ते १२ वर्षांपासून येथे वास्तव्यास नसलेल्या मतदारांना संपर्क साधत त्यांना मतदानासाठी जेजुरीत आणत मतदान करून घेण्यासाठी सर्वच पक्षातील उमेदवारांना मोठी “अर्थपूर्ण “कसरत करावी लागली आहे. यात मतदार “मालामाल “झाले तरी यातून सर्वच उमेदवार अगदी मेटाकुटीला आल्याचे मतदानानंतर दिसून आले. दरम्यान, संभाजी बिग्रेडच्या वतीने मतदार शुद्धीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.अनेक वर्षांपासून बाहेरगावी, परराज्यात असलेले मतदार शोधून ही नावे कमी करण्यात यावीत, मतदार यादी सदोष असून सर्व्हे करण्यात यावा. अशा आशयाचे पत्र संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप, मनसेचे तालुकाध्यक्ष उमेश जगताप यांनी एक महिन्यांपूर्वी नगरपालिका प्रशासनाला निवेदन देत मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेची तयारी झाल्याने वेळ निघून गेली होती. (दि.२) रोजी मतदानामध्ये अनेक परप्रांतीय मतदारांनी “अर्थपूर्ण” व्यवहार पाहून मतदान केले असल्याची बाब आता उघड होऊ लागली आहे. वास्तव्य नसलेल्या सुमारे ३ हजारांहून अधिक मतदारांनी “अर्थपूर्ण “सोय पाहून मतदान केल्यामुळे विजयाची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. अनेक मतदारांचे “अर्थपूर्ण “व्यवहाराचे रंजक परंतु उमेदवारांना वेठीस धरण्याचे किस्से बाहेर येऊ लागले आहेत. पुढील काळात अशा मतदारांची नावे कमी करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेत अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले. सामाजिक सलोखा जपणारी नगरी मुळातच जेजुरी नगरी ही गावगाडा आणि सामाजिक सलोखा बांधिलकी जपणारी नगरी आहे. आरोप- प्रत्यारोप, राजकीय मतभेद फक्त निवडणुकी पुरते मर्यादित राहतात निवडणूक झाली की, सर्व ग्रामस्थ “आम्ही जेजुरीकर “म्हणून एकत्र नांदतात मात्र, यंदाच्या निवडणुकीत वास्तव्य नसलेली गावच्या समस्या, सोयी सुविधा, विकासाचे देणे घेणे नसलेल्या मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने नेमके कोण सत्तेत येणार ? याची समीकरणे बदलली आहेत. गट- तट बाजूला करीत मतदान हटवा जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत परप्रांतीय मतदारांची भर पडल्याने अर्थकारणाला चालना मिळाली आहे. मात्र, हेच मतदार भविष्यात डोकेदुखी ठरणार असल्याचे संकेत या निवडणुकीत दिसून आले. सत्तेच्या सारीपाटावर जाताना हे मतदार कमी करण्याची गरज आहे. अन्यथा उमेदवारांना झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील गट- तट बाजूला ठेवून परप्रांतीय मतदार कमी करण्याची मागणी होत आहे.