जांबूत – चांडोह (ता. शिरूर) येथील शेतकरी हर्षल भुजबळ यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. २१) रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. सहा वर्षे वयाची ही बिबट मादी संवर्गातील असून तीला पुढील उपचार व निरीक्षणासाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले असल्याचे वनरक्षक लहू केसकर यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरखेड, जांबुत, चांडोह व फाकटे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. या परिसरातून दोन महिन्यात सुमारे २५ बिबटे वनविभागाने जेरबंद केले असले तरीही दिवसाढवळ्या शेतात काम करताना शेतकऱ्यांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व शासनाच्या आदेशानुसार वनविभागाने परिसरात पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी काहीसा दिलासा मिळाला असला तरी देखील भविष्यातील धोका टाळण्यासाठी वनविभागाने अधिकाधिक पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे व बिबट प्रवण क्षेत्र असलेला परिसर बिबटमुक्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.