शिरूर : शिरूर-मलठण या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील शेकडो खड्डे मागील अनेक दिवसांपासून वाहनचालक व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ आश्वासनांची पेरणी सुरू असून प्रत्यक्षात मात्र अर्धवट काम करून संपुर्ण दुरुस्तीचा मुहूर्त काही केल्या लागत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाधव हे पुणे येथे वास्तव्यास असून, त्यांना अद्याप या ठिकाणी येण्यासाठी वेळ मिळालेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “अधिकाऱ्याला पुण्याहून शिरूरला आणण्यासाठी आंदोलन करावे लागेल का?” असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत. या खड्ड्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अनेकदा लहान अपघातही घडत आहेत. यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक आणि रुग्णवाहिका यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वी दोन वेळा खड्डा बुजवण्यात आला होता; मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही दिवसांतच पुन्हा रस्ता उखडला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांनी वारंवार निवेदने, फोन, तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्षच होत असल्याचा आरोप केला जात आहे. “कर भरायचा मात्र वेळेवर, पण सुविधा मिळायची वेळ आली की आम्हाला वाट पाहायला लावली जाते,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक व्यापाऱ्याने दिली. जर लवकरात लवकर खड्डा बुजवून रस्त्याची शास्त्रोक्त व दर्जेदार दुरुस्ती केली नाही, तर नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबतील असा इशाराही देण्यात आला आहे. आता तरी संबंधित अधिकाऱ्यांना मुहूर्त सापडणार का, की शिरूरचा रस्ता अजून किती दिवस असा उघडा आणि उध्वस्त राहणार हाच खरा प्रश्न आहे.