नारायणगाव – जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उबाठा) पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक घड्याळ चिन्हावर एकत्रित लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. नारायणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी आमदार अतुल बेनके, सभापती संजय काळे, शिवसेनेचे तालुका समन्वयक दिलीप बाह्मणे, राष्ट्रवादी काँग्रेस (अप)चे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी,ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले, माजी जि. प. सदस्य गुलाब पारखे, पीडीसीसी बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे पाटील यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. खासदार कोल्हे म्हणाले की, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा काही प्रमाणात राष्ट्रवादीला अंतर्गत फायदा झालेला दिसून आला. त्याच पद्धतीने राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांनी हा निर्णय बारामती येथे झालेल्या बैठकित घेतला आहे. राज्यात १२ जिल्हा परिषदेच्या निवडणूका एकत्रित लढविल्या जाणार असून समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जायचं आहे. आंबेगाव तालुक्यात तुतारी आणि घड्याळ पक्षात एकमत होत नसल्यामुळे तिथे वेगळा निर्णय घेतला जाईल. शिरूर आणि हवेलीत आघाडीच्या संदर्भात दोन दिवसात अंतिम निर्णय होईल. खेडमध्ये शिवसेना (उबाठा) बरोबर चर्चा सुरु आहे असे डॉ.कोल्हे यांनी सांगितले. अतुल बेनके म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात बेशिस्त व पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्यावर राष्ट्रवादी कडून कडक कारवाई केली जाईल. तालुक्यातील सर्व जागा वाटपाचा निर्णय येत्या दोन दिवसात घेण्यात येईल.