प्रभात वृत्तसेवा चिंबळी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चिखली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी आणि ऑइलमिश्रित पाणी थेट नदीत सोडले जात असल्याने पवित्र इंद्रायणी नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देहू ते आळंदी या पुण्यभूमीतून वाहणाऱ्या या नदीपात्रात मोशी-चिंबळी हद्दीतील के. टी. बंधाऱ्याजवळ पाण्याचा रंग काळपट झाला असून, साबणासारखा पांढरा फेस मोठ्या प्रमाणावर साचला आहे. यामुळे नदीपात्रात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतीला पाणी पुरवण्यासाठी बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यात प्रदूषित पाणी साठल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पाण्यामुळे शेतीचे नुकसान तर होतच आहे, पण सोबतीलाच परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना विविध त्वचाविकार आणि इतर आजारांनी हैराण केले आहे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे प्रक्रिया न केलेले पाणी राजरोसपणे नदीत सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.पवित्र तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या नदीच्या प्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. नदीपात्रात साचलेला हा फेस आणि काळपट पाणी जलचर प्राण्यांसाठीही घातक ठरत असून, या प्रदूषणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी चिंबळी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.