जांबुत : महानगरपालिका निवडणुकांच्या धामधुमीनंतर आता पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विशेषतः शिरूर तालुक्यातील कवठे येमाई — टाकळी हाजी या जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, येथे अटीतटीची पंचरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. अनेक इच्छुकांनी आपापल्या पक्षांकडे उमेदवारीची मागणी करत आतापासूनच प्रचाराचा धडाका लावला आहे. मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र राजेंद्र गावडे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. गेल्या ६० वर्षांचा वारसा आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे यांच्या जोरावर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून दामू घोडे यांनीही कंबर कसली असून, त्यांनी जनसंपर्कावर भर दिला आहे. भारतीय जनता पार्टीकडून ज्येष्ठ नेत्या सावित्रा थोरात या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने भाजपची ताकद कोणाच्या पारड्यात पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे समर्थक आणि माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. पोकळे यांचा निर्णय या भागातील राजकारणाची गणिते फिरवू शकतो. ‘मशाल’ पेटणार? नव्या नेतृत्वाचा उदय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये उद्योजक बाळासाहेब डांगे यांच्या प्रवेशाने नवा उत्साह संचारला आहे. “३५ वर्षे निष्ठा ठेवूनही संधी मिळाली नाही, त्यामुळे आता जनतेच्या आग्रहास्तव घराणेशाहीविरुद्ध निवडणूक लढवत आहे,” असा पवित्रा डांगे यांनी घेतला आहे. युवकांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी उभी राहत असल्याने उबाठा गटाची ताकद वाढल्याचे चित्र आहे. विकासाचा मुद्दा की वैयक्तिक संपर्क? राजेंद्र गावडे यांनी कोट्यवधींच्या निधीचा दावा केला असतानाच, डॉ. सुभाष पोकळे आणि दामू घोडे यांनी सर्वसामान्यांशी असलेली नाळ आणि सामाजिक कार्याचा आधार घेतला आहे. बैलगाडा शर्यती, क्रीडा स्पर्धा आणि वैयक्तिक मदतीमुळे मतदार आपल्यालाच कौल देतील, असा विश्वास या नेत्यांना वाटतोय. एकूणच, प्रस्थापित नेतृत्व विरुद्ध नवीन चेहरा असा संघर्ष या पंचरंगी लढतीत पाहायला मिळणार असून, शिरूरच्या ‘बेट’ भागाचा ‘विजयाचा गुलाल’ कोण उधळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.