प्रभात वृत्तसेवा पळसदेव – राज्यात नगरपालिकांच्या निवडणुकांचा तडाखा सुरू असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका देखील तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. काही गटांत उमेदवार ठरले असून त्यांनी जाहीरपूर्व कामाला सुरुवातही केली आहे; तर काही प्रभागांत अजूनही चाचपणी सुरूच आहे. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बंड पुकारत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांच्यासोबत ‘कृष्णा-भीमा विकास आघाडी’ स्थापन केली. या नव्या आघाडीमुळे इंदापूर नगरपालिकेचे राजकीय गणित पूर्णपणे बदलले आहे. जर ही आघाडी नगरपालिका लढतीत यशस्वी ठरली, तर जिल्हा परिशद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही तिचा परिणाम तितकाच प्रभावी दिसेल. दरम्यान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रभावाखालील प्रभागांत नव्या चेहर्यांना प्राधान्य दिल्यास चांगले यश मिळू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे अनुमान आहे. तथापि, लोक स्वीकारतील का? आणि विरोधी आघाडीच्या आव्हानात टिकेल का? हे येणारे दिवस ठरवतील. अनेक उमेदवार ठेकेदार, कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह राष्ट्रवादी (अजित पवार गट) अनेक संभाव्य उमेदवार ठेकेदारी व्यवसायात सक्रिय आहेत. तालुक्यात विकासकामांसाठी निधी आलेला असला तरी अनेक कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट राहिल्याने जनतेत नाराजी वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर यंदा नवखा, स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार हवा अशी मागणी ग्रासरूट स्तरावर जोर धरत आहे. ‘ठेकेदारी विरुद्ध राजकारण’ संदेश नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्याला ठेकेदारी करायची असेल त्याने राजकारणात येऊ नये, आणि ज्याला राजकारण करायचे आहे त्याने ठेकेदारी करू नये. असा स्पष्ट संदेश दिला होता; परंतु इंदापूर तालुक्यात मात्र वास्तव याच्या पूर्ण उलट आहे. राष्ट्रवादीतील अनेक प्रमुख कार्यकर्ते ठेकेदार झाले असून, या ठेकेदारीतून निर्माण झालेली ‘मलिदा गँग’ ओळख लोकसभेपासूनच आजपर्यंत कायम असल्याची चर्चा सुरू आहे. राजकारणातील जाणकारांचे मत या गटाकडून झालेले दर्जाहीन काम, निधीचा कथित गैरवापर आणि लोकांमधील विरोध लक्षात घेता, यंदाच्या जिल्हा परिरूषद व पंचायत समिती निवडणुकीत त्यांना बाजूला ठेवणे पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते.