प्रभात वृत्तसेवा वडापुरी – जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत झाल्याने इंदापूर तालुक्यात आगामी निवडणुकीच्या तारखेकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने तत्पूर्वीच गट, गण रचना, आरक्षण सोडत, जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण, अंतिम मतदार याद्या अशी प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे.निवडणूक आयोग पन्नास टक्क्याच्या आत जिथे आरक्षण आहे, अशा राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये लवकरच निवडणूक घेण्याची शक्यता आहे. त्यात पुणे जिल्हा परिषदेचाही समावेश आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या व विविध उपक्रमांवर लाखो रुपये खर्च केलेल्या इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांचे डोळे निवडणुकीच्या तारखेकडे लागले आहेत. इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ गट व पंचायत समितीचे सोळा गणाची नव्याने रचना झाली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांची तारांबळ झाली आहे. नव्याने तयार झालेल्या अनेक गट-गणात आयात उमेदवारांची ही चर्चा इंदापूरात जोर धरू लागली आहे. इच्छुक उमेदवार मात्र निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.