प्रभात वृत्तसेवा इंदापू ( नीलकंठ मोहिते ) – नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वडापुरी-माळवाडी जिल्हा परिषद गटातील राजकारण चांगलेच तापले असून, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) आणि विरोधी कृष्णा-भीमा विकास आघाडी या दोन्ही बाजूंनी उमेदवारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. परिणामी इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण गटात प्रचंड चलबिचल निर्माण झाली असून, राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नव्या वर्षाची सुरुवात होताच इंदापूर तालुक्यातील विरोधकांचे राजकीय वारे थेट भारतीय जनता पार्टीच्या (कमळ) दिशेने वाहू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे कृष्णा-भीमा विकास आघाडीचे या निवडणुकीतील अस्तित्व टिकणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत असून, ही लढत ‘कमळ’ फुलणार की ‘घड्याळ’ टिकून राहणार, यावर केंद्रित झाल्याचे चित्र आहे. या गटातील गोखळी आणि तरंगवाडी ही दोन गावे नेहमीच राजकीय निकालाची दिशा ठरवणारी ठरली आहेत. राज्याचे विद्यमान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना याच गावांतून प्रचंड मताधिक्य मिळाले होते. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही या दोन गावांकडेच निकालाची चावी राहणार का, अशी जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही गावांतील मतदारसंख्या साडेतीन हजारांहून अधिक असल्याने त्यांचे राजकीय महत्त्व अधिकच वाढले आहे. वडापुरी-माळवाडी हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे, इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे, गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड हे ओबीसी समाजातील प्रभावी चेहरे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. दुसरीकडे भाजप नेते प्रवीण माने यांच्या माध्यमातून बाबुळगाव परिसरातील देवकर परिवारातील तगडा उमेदवार ‘कमळ’ हाती घेऊन जिल्हा परिषदेत दंड थोपटण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच माजी पंचायत समिती सभापती करणसिंह घोलप आणि जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांनीही वाडी-वस्ती पातळीवर चाचपणी सुरू केली आहे. सुमारे 32 हजार मतदारसंख्या असलेल्या या नव्या गटात पंचायत समिती गणासाठीही इच्छुकांची गर्दी वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सर्वसाधारण जागेवर एखादा ओबीसी, सुशिक्षित आणि तरुण चेहरा देत नवी राजकीय खेळी करणार का, याबाबतही कुजबुज सुरू आहे. एकूणच वडापुरी-माळवाडी गटातील ही लढत केवळ निवडणूक नसून ‘कमळ’ विरुद्ध ‘घड्याळ’ यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई ठरणार की एखादा नवा राजकीय चमत्कार घडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. गारटकर, माने एकत्रित लढणार? दरम्यान, कृष्णा-भीमा विकास आघाडीचे प्रभावी नेते प्रदीप गारटकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास भाजप नेते प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढवतील, असे संकेत मिळत आहेत. मात्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर या संपूर्ण राजकीय गणिताचा तोल अवलंबून आहे. इंदापूर नगर परिषदेत कृष्णा-भीमा विकास आघाडीचा प्रयोग पुढेही कायम राहिल्यास विरोधकांचे पारडे निश्चितच जड ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.