प्रभात वृत्तसेवा इंदापूर – ग्राम महसूल प्रशासनासाठी आवश्यक असलेली आधुनिक आयटी उपकरणे अद्याप उपलब्ध करून न दिल्याने इंदापूर तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी आक्रमक झाले आहेत. शासनाकडील दिरंगाईच्या निषेधार्थ तालुक्यातील १२ मंडल अधिकारी व ६२ तलाठ्यांनी सोमवारी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकत सर्व कामकाज बंद ठेवले. महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या निवेदनानुसार, सध्या वापरात असलेले लॅपटॉप व प्रिंटर-कम-स्कॅनर जीर्ण व निकामी झाले असून दैनंदिन ऑनलाईन कामकाज करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन, उच्चक्षमतेची आयटी उपकरणे देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ई-पिक पाहणी मंजुरी व्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त जबाबदारी देऊ नये, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे.संघटनेने नमूद केले की, जमाबंदी आयुक्तांनी २७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात उपकरण वाटप सुरू करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र १३ डिसेंबर २०२५ अखेर कोणताही शासनादेश निघालेला नसल्याने प्रक्रिया ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर १५ डिसेंबरपासून डिजिटल सिग्नेचर (DSC) तहसील कार्यालयात जमा करून संपूर्ण ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम ७/१२ व ८-अ उतारे, ई-चावडी, ई-पिक पाहणी, ई-फेरफार, ऑनलाईन वाहन तपासणी, अॅग्रीस्टॅक मंजुरी आदी सेवांवर झाला असून, याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभर कामकाज ठप्प राहिल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून, महसुली कामे रखडल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.