प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूरमध्ये ऊसदराच्या मागणीसाठी सन २०१२ मध्ये झालेल्या तीव्र ऊस आंदोलनाशी संबंधित दाखल गुन्ह्यांप्रकरणी तब्बल १३ वर्षांनंतर मोठा न्यायालयीन दिलासा मिळाला आहे. या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या एकूण आठ गुन्ह्यांपैकी तीन गुन्ह्यांत माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सतिशभैय्या काकडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, निलेश देवकर यांच्यासह ५१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. २०१२ मध्ये ऊसाला प्रतिटन २७०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी करत शेतकरी रस्त्यावर उतरले होते. तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या परिस्थितीवर तोडगा काढावा, या मागणीसाठी कर्मयोगी साखर कारखान्यावर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले. यात कुंडलिक कोकाटे या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. जवळपास आठवडाभर चाललेल्या आंदोलनानंतर अखेर राजारामबापू साखर कारखान्याने प्रतिटन २५०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आणि उसदराची कोंडी फुटली होती.हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले असले, तरी या लढ्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन सुमारे ३०० रुपये जादा दर मिळाला, हे या आंदोलनाचे मोठे फलित ठरले होते. इंदापूर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एच. फारुकी यांच्या न्यायालयात या प्रकरणाचे कामकाज पार पडले. ॲड. एन. जे. शहा, ॲड. महेश ढुके, ॲड. श्रीकांत करे, ॲड. सचिन राऊत आणि ॲड. नवनाथ सोनटक्के यांनी हे खटले विनामूल्य लढवून आंदोलकांना न्याय मिळवून दिला. १३ वर्षांनंतर मिळालेल्या या निर्णयामुळे ऊस आंदोलनाचा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक अध्याय न्यायालयीन निकालाने संपुष्टात आला आहे.