Indapur News – राज्य सरकारच्या अभय योजनेला इंदापूर शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, यामुळे नगरपरिषदेच्या तिजोरीत विक्रमी महसूल जमा झाला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण २६४६. ६१ लाख रुपयांची मालमत्ता कर मागणी असताना नगरपरिषदेने एकूण १३०३. ७० लाख (१३ कोटी ३ लाख) रुपयांची कर वसुली करण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, केवळ अभय योजनेच्या शेवटच्या आठ दिवसांत (२४ ते ३१ मार्च) तब्बल ५७५. ९२ लाख रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. या योजनेचा शहरातील २, २७४ मालमत्ताधारकांनी लाभ घेतला असून, त्यांची एकूण ३५०. ३६ लाख रुपयांची शास्ती (दंड) माफ करण्यात आली आहे. या सवलतीमुळे थकबाकीदार नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. नगराध्यक्ष भरत शहा यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले, अभय योजना ही नागरिकांना दिलासा देणारी आणि नगरपरिषदेचा महसूल वाढवणारी दुहेरी लाभाची योजना ठरली आहे. सुट्टीच्या दिवशीही रात्री १२ वाजेपर्यंत वसुली विभागाने घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. त्यांनी मुख्याधिकारी रमेश ढगे, कर निरीक्षक स्वप्निल हाके व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी सांगितले की, शासनाचा निर्णय लागू झाल्यापासून वसुली विभागाने नियोजनबद्ध काम केले. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळेच ही विक्रमी वसुली शक्य झाली आहे. या वाढलेल्या महसुलामुळे शहरातील प्रलंबित विकासकामांना आता मोठी गती मिळणार आहे. सरकारच्या निर्णयाचे नगराध्यक्षांकडून स्वागत अभय योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा दिल्याबद्दल नगराध्यक्ष भरत शहा यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच ही योजना यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे नगरपरिषदेचा महसूल वाढून शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचेही शहा यांनी सांगितले.