Indapur News – खारट जमिनीत शेती म्हणजे तोटा, असा समज मोडीत काढत इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथील शेतकरी महादेव बोराटे यांनी गव्हाच्या उत्पादनात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. केवळ दोन एकर क्षेत्रात तब्बल ५१ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेऊन त्यांनी कृषी क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या यशामुळे खाऱ्या व कमी उत्पादक जमिनी असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवी दिशा निर्माण झाली आहे. महादेव बोराटे यांनी क्षार-सहिष्णु ‘केआरएल-२१०’ या गव्हाच्या वाणाची निवड करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पेरणी केली. आयसीएआर-सीएसएसआरआयने विकसित केलेला हा वाण विशेषतः खारट जमिनींसाठी उपयुक्त असून, त्यातून अधिक उत्पादन मिळण्याची क्षमता आहे. पारंपरिक समजुतींना छेद देत बोराटे यांनी या वाणाच्या माध्यमातून विक्रमी उत्पादन घेतले. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत त्यांनी शून्य मशागतीचा अवलंब केला. नांगरणी न करता बियाणेसह-खताची पेरणी यंत्राद्वारे त्यांनी पेरणी केली. विशेष म्हणजे, इतर वाणांसाठी लागणाऱ्या बियाण्याच्या तुलनेत त्यांनी केवळ ८० किलो बियाण्यांतच पेरणी पूर्ण केली. यामुळे खर्चात मोठी बचत झाली. खाऱ्या जमिनीतही योग्य वाण, तंत्रज्ञान आणि नियोजन वापरल्यास भरघोस उत्पादन मिळू शकते, हे बोराटे यांनी सिद्ध केले आहे. या प्रयोगातून बोराटे यांनी केवळ उत्पादन वाढवले नाही, तर शेतीत खर्च कमी करून नफा वाढवण्याचा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या या प्रयोगाची दखल घेतली जात असून, कृषी तज्ञांकडूनही त्यांचे कौतुक होत आहे. संतूलीत खत व पाणी व्यवस्थापन नायट्रोजनचा वापर कमी करत १३५ ते १४० किलोपर्यंत मर्यादित ठेवला, तर फॉस्फरसचे प्रमाण ६० किलोपर्यंत दिले. कमी खर्चात अधिक उत्पादन हा त्यांचा मूलमंत्र ठरला. पाण्याच्या वापरातही त्यांनी मोठी बचत साधली. पारंपरिक शेतीत लागणाऱ्या ३ ते ४ पाण्यांऐवजी त्यांनी केवळ १ ते २ सिंचनांमध्ये पीक यशस्वी केले.