इंदापूर (प्रतिनिधी) : श्री वर्धमान विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे वार्षिक पारितोषिक वितरण उपजिल्हाधिकारी तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी नामदेव टिळेकर यांच्या शुभहस्ते जल्लोषात पार पडले. इयत्ता पाचवी ते बारावीतील शैक्षणिक गुणवंत विद्यार्थी तसेच विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना प्रशस्तीपत्रक व रोख बक्षिसांनी गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना टिळेकर यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शिस्त, शिक्षकांचे काटेकोर मार्गदर्शन आणि शाळेने दिलेले संस्कार यामुळेच आयुष्यात यशाचा मार्ग सुकर झाल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.स्पर्धा परीक्षांमध्ये यशासाठी केवळ अकॅडमी नव्हे, तर श्री वर्धमान विद्यालयासारख्या गुणवत्तापूर्ण शाळाच विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवतात,असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश निश्चित असल्याचा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमास वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रतिनिधी, नवनिर्वाचित सरपंच अरुण वीर,शाळा समिती अध्यक्ष मकरंद वाघ, उपाध्यक्ष प्रशांत महामुनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.अध्यक्ष मकरंद वाघ यांनी विद्यालयाची गौरवशाली परंपरा व शैक्षणिक वारसा अधोरेखित केला. प्राचार्य हनुमंत कुंभार यांनी वार्षिक शैक्षणिक कामगिरीचा आढावा मांडला. बालकलाकार स्वराज जाधवच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली. संपूर्ण समारंभ विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास आणि नवे स्वप्न पेरणारा ठरला.