प्रभात वृत्तसेवा इंदापूर – नगरपरिषद निवडणुकीचा ढोल औपचारिकरित्या वाजायला अजून दोन दिवस शिल्लक असले, तरी इंदापूरमध्ये निवडणुकीचा जंगी बाजा आधीच सुरू झाला आहे. पक्षीय उमेदवारांनी मोहीम वाढवलीच आहे; पण या वेळी खरी चर्चा रंगवणारे आहेत अपक्ष उमेदवार. चिन्ह वाटप 26 नोव्हेंबरला असतानाच अपक्षांनी ‘पहिले पाऊल आपलेच’ धोरण राबवत दारोदार संपर्क मोहीम गतीमान केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्षांचे समीकरणच अंतिम निकालाचा गाभा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.यंदा पाच उमेदवारांची नगराध्यक्ष पदासाठी झुंज असून, एकमेव अपक्षाचे खास लक्षवेधन असणार आहे. इंदापूर नगराध्यक्षपदासाठी या वेळी प्रचंड चुरस आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- भरत शहा, वंचित बहुजन आघाडी- कीर्तीकुमार वाघमारे, काँग्रेस- शपरुद्दीन शेख, कृष्णा-भीमा विकास आघाडी- प्रदीप गारटकर व अपक्ष- सम्राटसिंह पोळ हे रिंगणात आहेत. पक्षीय घडामोडी, गटबाजी, प्रतिगटबाजीच्या गर्दीत हा एक अपक्ष कोणाच्या मतांचे अक्षरशः ‘हायजॅक’ करणार, यावर सर्वांचे डोळे खिळले आहेत.येथील नगरसेवक पदांसाठी 56 उमेदवार, त्यात तब्बल 15 अपक्ष ‘गेम चेंजर’ ठरण्याची लक्षणं आहेत की नाही हे निकालच ठरवेल. नगरसेवक पदाच्या 20 जागांवर 56 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 15 अपक्ष आहेत. हे 15 अपक्षच संपूर्ण गणित ढवळून काढणार, असा अंदाज मजबूत होत आहे. कारण राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुद्ध, कृष्णा-भीमा विकास आघाडी, ही सरळसरळ दोन फळींची झुंज असताना अपक्षांची पडलेली घुसखोरी दोन्ही पॅनलसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. काही प्रभागांत अपक्षांची सामाजिक पकड इतकी घट्ट आहे की ते ’किंगमेकर’ असल्याचे दृश्य स्पष्ट होत आहे. तर काही ठिकाणी अपक्षांनी निर्माण केलेले मतविभाजन पक्षीय उमेदवारांची समीकरणे धोक्यात आणत आहे. इंदापूरची निवडणूक तापली आहेच; पण या आगीत ‘अपक्षांनी’ घातलेले तेल पुढील दिवसांत मोठा राजकीय स्फोट घडवू शकते, अशीच चर्चा गल्लीपासून सोशल मीडियापर्यंत उसळत आहे. इंदापूरचा निकाल काहीही असो, अपक्ष ‘साइड रोल’मध्ये नसून या निवडणुकीतील ‘मुख्य पात्र’ ठरणार, हे आता निश्चित झाले आहे. ‘भावणार’, ‘पाडणार’ आणि ‘जिंकवणार’ इंदापूरमध्ये अपक्ष हे केवळ पूरक उमेदवार नाहीत ते निवडणुकीची दिशा ठरवणारे निर्णायक चेहरे आहेत. लढतीत अपक्ष तिसरा पर्याय म्हणून पक्षीय उमेदवारांचा मार्ग रोखतील. मत विभाजनामुळे काही ताकदवान पक्षीय उमेदवारांचे समीकरण उलथेल. या सर्वांमुळे दोन्ही मोठ्या पॅनलच्या रणनिती पूर्णपणे पालटल्या आहेत. काही पक्षीय उमेदवारांनी आधीच काही अपक्षांसोबत ‘मूक समन्वय’ सुरू केल्याची गुप्त चर्चा देखील रंगली आहे. चिन्हवाटपानंतर ‘काउंटडाउन’ सुरू 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान चिन्हवाटपाची प्रक्रिया पार पडणार आहे; मात्र प्रचारासाठी फक्त चार पाच दिवसांचीच वेळ हातात येणार असल्याने अपक्षांनी आधीपासूनच ‘फुल स्पीड’ने मोहीम उभारली आहे. घराघरातील भेटी, लहानमोठ्या बैठकांचा फड, समाजघटकांना जोडण्याचा प्रयत्न अशा धडाकेबाज सुरुवातीमुळे आगामी काही दिवसांत अपक्ष इंदापूरच्या राजकीय नकाशावर केंद्रस्थानी येतील यात शंका नाही.