प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत मोठी आणि अनपेक्षित उलथापालथ दिसून आली. निवडणुकीदरम्यान एकमेकांविरोधात दंड थोपटलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अखेर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले. भाजपच्या गणितांना धक्का दिला आहे. उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे मितेश प्रदीप गादिया आणि भाजपचे नितीन पाचर्णे यांच्यात थेट लढत झाली. निवडणुकीत गादिया यांनी १४ मते मिळवत पाचर्णे (११ मते) यांचा पराभव केला. उपनगराध्यक्षपदी बाजी मारली.शिरूर नगरपरिषदेच्या रसिकलाल धारीवाल सभागृहात उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी विशेष सभा पार पडली. नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच बैठकीत नगरपरिषदेतील सत्तासमीकरणे स्पष्ट झाली. राज्य व केंद्रात सत्तेत असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) स्थानिक पातळीवर एकत्र येतील आणि भाजपचा उपनगराध्यक्ष होईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आल्याने राजकीय गणिते पूर्णतः बदलली आहेत. हे निवडीनंतर स्पष्ट झाले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक ११ नगरसेवक निवडून आणणाऱ्या भाजपला अखेर विरोधी बाकावर बसावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे ७ नगरसेवक असून एका अपक्ष नगरसेविकेच्या पाठिंब्यामुळे त्यांचे संख्याबळ ८ झाले आहे. दुसरीकडे, शरद पवार गटासह दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने नगरपरिषदेत सत्तास्थापना झाली आहे. स्वीकृतसाठी तिघांची निवड यावेळी स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. अभिजित पाचर्णे, राजेंद्र लोळगे, अमोल चव्हाण यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. शिरूर नगरपरिषदेत राजकीय जुळवाजुळवीमुळे येत्या काळात स्थानिक राजकारणात आणखी कोणते बदल घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गादियांचा पक्षबदल पथ्थ्यावर पडला केंद्रात व राज्यात एकत्र असलेले भाजप- राष्ट्रवादी पक्ष शिरूरमध्ये मात्र परस्परांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उपनगराध्यक्षपदी निवड झालेले गादिया हे प्रभाग क्रमांक ८ मधून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये होते. मात्र, निवडणूक काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये प्रवेश केला. थेट विजय मिळवला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिरूरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.