प्रभात वृत्तसेवा माळेगाव – माळेगाव (ता. बारामती) येथील नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जनमत विकास आघाडी यांच्या युतीने स्पष्ट बहुमत सिद्ध करून नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुयोग सातपुते यांनी ११ हजार मतांच्या आघाडीने दणदणीत विजय मिळविला. निवडणुकीत एकूण १४ हजार ४५८ मतदान झाले होते. त्यानुसार नगराध्यक्ष पदासह १८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीतून खुले झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने पारंपारिक विरोधक रंजन तावरे यांच्या जनमत विकास आघाडीबरोबर युती करून १२ जागा राष्ट्रवादीला, ५ जागा जनमत आघाडीला आणि १ जागा भाजप पुरस्कृत प्रमोद तावरे यांना सोडण्याचा फार्मुला आखला होता. मात्र, ही युती कार्यकर्त्यांना रुचली नाही. परिणामी सुयोग सातपुते यांच्या नगराध्यक्षपदासह राष्ट्रवादीला ९ जागा, जनमत आघाडीला ३ जागा आणि प्रमोद तावरे यांच्या माध्यमातून १ जागा मिळाली. याउलट माजी सरपंच दीपक तावरे यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष उमेदवारांनी पाच जागांवर विजय मिळवत राजकीय ताकद दाखवून दिली. या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला एकही जागा मिळविता आली नाही. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपेश भोसले यांना केवळ ३ हजार मते मिळाली. प्रभाग ९ ची ठळक बाब प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादीच्या ॲड. गायत्री राहूल तावरे व अपक्ष जयश्री बाळासाहेब तावरे यांना प्रत्येकी ६१६ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला सोरटे यांनी चिठ्ठी पद्धतीने जयश्री तावरे यांना विजयी घोषित केले. या विजयामुळे अपक्षांनी पाच जागांवर विजय संपादन केला. सर्व अपक्ष उमेदवार निवडून येण्यात गटनेते दीपक तावरे यांची रणनीती व संघटन कौशल्य निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. क्रॉस व्होटिंगचा दणका माळेगावात ‘पॅनल टू पॅनल’ मतदानाची अपेक्षा होती. मात्र, मतदारांनी भावकी, बेट, मित्रपरिवार आणि नाराजी व्यक्त करत ‘क्रॉस व्होटिंग’चा दणका दिला. परिणामी अपक्ष उमेदवारांच्या अंगावर गुलाल उधळला गेला. प्रक्रियेत माजी सरपंच जयदीप विलास तावरे व जयदीप दिलीप तावरे विजयी झाले. प्रभाग ११ मध्ये अविनाश भोसले यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. विकासाचा निर्धार स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादी व जनमत विकास आघाडीने विकासाच्या मुद्द्यांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. निकालानंतर समर्थकांनी जल्लोष करीत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखाली स्थिर प्रशासन व विकासाभिमुख निर्णय घेण्याची ग्वाही दिली.