प्रभात वृत्तसेवा लोणी देवकर – तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीची लाट निर्माण झाली असून, तापमानाचा पारा ९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने नागरिक अक्षरशः गारठले आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या तीव्र थंडीमुळे सकाळ, संध्याकाळ बाजारपेठांतील गर्दीवर परिणाम झाला आहे. बाजारपेठा सकाळी उशिराने सुरू होत असून, ग्राहकांच्या कमी प्रतिसादामुळे रात्री लवकर बंद होत आहेत. शेतमजूर, चाकरमाने आणि कामगार सायंकाळी लवकर घरी परतत आहेत. नागरिक स्वेटर, मफलर आणि जर्किन परिधान करत असल्याने वातावरण रंगीबेरंगी दिसत आहे. तालुक्यात जागोजागी रस्त्याच्या कडेला हरियाणा, पंजाब राज्यातून आलेल्या विक्रेत्यांनी उबदार ब्लँकेट आणि जर्किनची दुकाने थाटली आहेत. दरम्यान, सध्याच्या जोरदार थंडीमुळे दुभत्या जनावरांच्या चयापचयाच्या क्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याने दूध देण्याच्या क्षमतेत घट झाली असल्याची माहिती दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. थंडीमुळे वृद्ध नागरिकांनी रात्री व पहाटे अतिशय गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. रविवार दिवसभर हवेतील गारठा कायम होता.