प्रभात वृत्तसेवा जुन्नर – जुन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत मोठा गदारोळ झाला. या गदारोळातच कोणीतरी अज्ञाताने सभेच्या कच्च्या नोंदी असलेल्या रजिस्टरमधील (प्रोसिडिंग) फाडले, त्याची जुन्नर पोलिसांत तक्रार दाखल केली गेली.यासंदर्भात नगरपरिषदेच्या वतीने पोलीस ठाण्यात देण्यात आलेला तक्रार अर्ज बाळासाहेब भोसले सभा अधीक्षक यांनी दिला असून, या अर्जावर मुख्याधिकारी यांनी सही केलेली आहे. प्रोसिडींग फाडणाऱ्या अज्ञाताचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेप्रसंगीचे सीसीटीव्ही फूटेज देण्याची मागणी माजी नगरसेवक मधुकर काजळे यांनी मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे. सीसीटीव्ही फुटेज सोबत मीनीटस बुकच्या कॉपी देखील मिळाव्यात असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.दरम्यान, उपनगराध्यक्ष पदाकरिता अलका फुलपगार व रूपाली परदेशी यांनी आपले अर्ज दाखल केले होते. परंतु, फुलपगार यांच्या अवैध बांधकामाबाबत आक्षेप घेण्यात आल्यानंतर त्यांचा अर्ज पिठासीन अधिकारी यांनी बाद केल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ सुरू झाला. रात्री उशिरारपर्यंत चाललेल्या ह्या नाट्यमय घडामोडीमुळे नगरपालिकेत सुमारे दहा तास कामकाज ठप्प होते. रात्री उशिरा पिठासीन अधिकारी सुजाता काजळे यांनी रूपाली परदेशी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच स्वीकृत नगरसेवक पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसने शिफारस केलेले लक्ष्मीकांत कुंभार यांची निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी यांनी जाहीर केले. तसेच शिवसेना शिंदे घटना शिफारस केलेले जमीर कागदी यांच्यावरील निर्णय त्यांनी राखून ठेवला. २० नगरसेवकांच्या सभागृहात केवळ एक नगरसेवक असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका रूपाली परदेशी यांची उपनगराध्यक्षपदी झालेली निवड सर्वांनाच धक्का देणारी ठरली होती. परिणामी झालेल्या गदारोळामुळे नगरपालिका परिसरात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या भागात काही वेळ तणाव निर्माण झालेला होता. मोठ्या संख्येने असलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे व मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक दाखल झाल्याने या परिसरात छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही. प्रोसिडींग फाडल्याची तक्रार मंगळवार (दि.१३) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या कच्च्या नोंदी रजिस्टरमध्ये घेण्यात आलेल्या होत्या. त्याचा अहवाल तयार करण्यासाठी हे रजिस्टर पहिल्या मजल्यावर सायंकाळी आणण्यात आले. हे अहवाल तयार करण्याचे काम सुरू असताना काही नगरसेवकांनी रजिस्टरची मागणी केली होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने इतिवृत्तातील पाने फाडली असून, याला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्याचे तक्रारीत नमूद केले आहे. “या प्रकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहीती देण्यात आली आहे. उपनगराध्यक्षपदाच्या निवडीबाबत त्यांच्याकडून आलेल्या निर्देशानुसार पुढील निर्णय होईल.” – गोविंद शिंदे, प्रांताधिकारी “तक्रार अर्ज आलेला आहे. परंतु, योग्य पद्धतीने दिला गेला नसल्याने सक्षम अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करणे अपेक्षित आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणी केल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.” – किरण अवचर, पोलीस निरीक्षक, जुन्नर “यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेलेलो असल्याने सदर प्रकरणाची सर्व तांत्रिक शहानिशा करून माहिती देण्यात येईल.” – चरण कोल्हे, मुख्याधिकारी