प्रभात वृत्तसेवा दौंड – दौंड नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळे विजयी झाल्या असून नगरसेवक पदासाठी भाजप पुरस्कृत नागरी हित संरक्षण मंडळाचे १७ उमेदवार विजयी झाले आहेत. दौंड नगरपरिषदेत राष्ट्रवादीने बाजी मारल्याने माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, आमदार राहुल कुल यांना हा निकाल धक्कादायक ठरला आहे. दौंड नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची झाली. नगरपरिषदेचा प्रभाग ९ अ वगळता इतर ठिकाणी (दि.२) मतदान झाले होते. प्रभाग ९ अ चे (दि.२०) मतदान झाले होते. (दि.२१) सकाळी दौंड-अहिल्यानगर रोडवर असलेल्या शासकीय धान्य गोदामात प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार रिंगणात होते तर नगरसेवक पदाला २६ जागांसाठी ८६ उमेदवार उभे होते. भाजप पुरस्कृत नागरी हित संरक्षण मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुख्य लढत झाली. नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत असली तरी तिरंगी लढत झाली होती. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळे, भाजप पुरस्कृत नागरी हित संरक्षण मंडळाच्या मोनाली वीर, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) कोमल बंड यांच्यात अटीतटीची लढत झाली. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळे यांनी तब्बल ९६३ मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीपासून ते अखेरच्या फेरीपर्यत त्यांची आघाडी हजाराच्या पटीत वाढत गेली. दुर्गादेवी जगदाळे यांनी ४८९१ मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली. नगरसेवक पदासाठी नागरिक संरक्षण मंडळाचे १७ उमेदवार विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ९ उमेदवार विजयी झाले.दौंड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत नागरी हित संरक्षण मंडळ यांच्याकडून भाजपा आमदार राहुल कुल व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार रमेश थोरात व माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळे यांच्या प्रचारसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगता सभा घेतली होती. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर मोठा जल्लोष करत गुलालाची उधळण केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी निलप्रसाद चव्हाण यांनी काम पाहिले. पराभवातून आत्मचिंतनाची गरज नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड शहरात तगडे पदाधिकारी यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करून रान तापवले होते. माजी आमदार रमेश थोरात, वीरधवल जगदाळे यांच्यासह स्वप्निल शहा, तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोट बांधली होती. दौंड शहराला विकासाचे रोल मॉडेल बनवू, असे अजित पवार यांनी आश्वासित केले होते. प्रेमसुख कटारिया यांची सत्ता उलथवून टाकण्यात अजित पवार यांना यश आले. हा पराभव कटारिया, आमदार कुल यांना जिव्हारी लागणारा ठरला आहे. नगरपरिषदेची सत्ता राष्ट्रवादीने खेचून आणल्याने भाजप, नागरी हित संरक्षण मंडळाला आत्मचिंतनाची गरज आहे. तर राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह दुणावला असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.