प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित ग्लोबल कृषी महोत्सव २०२६ च्या प्रचार रथाचा शुभारंभ नवीन वर्षाच्या निमित्ताने उत्साहात करण्यात आला. ८ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या या भव्य कृषी महोत्सवाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा रथ सज्ज करण्यात आला आहे.केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांच्या हस्ते या रथाचे उद्घाटन करण्यात आले. हा महोत्सव शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि थेट प्रात्यक्षिके अनुभवण्याची संधी देणार आहे. महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांना बळीराजाचा ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. उद्घाटनप्रसंगी शास्त्रज्ञ भरत टेमकर, डॉ. राहुल घाडगे, योगेश यादव, डॉ. दत्तात्रय गावडे, निवेदिता शेटे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.दीप्तीमान दृश्ये आणि माहितीफलकांनी सजवलेला हा प्रचार रथ जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व संगमनेर तालुक्यांतील दुर्गम भागांत फिरणार आहे. हा रथ एका मोबाइल माहिती केंद्राप्रमाणे काम करणार असून त्याद्वारे महोत्सवाचे वेळापत्रक, चर्चासत्रे आणि पीक प्रात्यक्षिकांची माहिती पत्रकांद्वारे दिली जाणार आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणून आधुनिक शेतीला चालना देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.