प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – खेड तालुक्यातील जावळेवाडी-मंदोशी येथे शनिवारी (दि.१३) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन एक युवक भाजला. तसेच संबंधित घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप पंचनामा न झाल्याने तसेच गॅस एजन्सीचे प्रतिनिधी, गॅस कंपनीचे अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने पीडित कुटुंबासह ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जावळेवाडी-मंदोशी येथील सीताराम मारुती गोडे यांच्या घरी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. जुना गॅस सिलिंडर संपल्यानंतर त्यांच्या सूनेने नवीन सिलिंडर जोडला. मात्र, सिलिंडर जोडताच त्यातून गॅस गळती सुरू असल्याचे लक्षात आले आणि घरात तीव्र वास पसरला. गॅसचा वास येत असल्याचे लक्षात येताच त्यांचे दीर लहू गोडे (वय ३०) यांना बोलावले. खबरदारी म्हणून लहान मुलाला तत्काळ घराबाहेर काढण्यात आले. लहू गोडे यांनी सिलिंडरची पाहणी करून गॅस सुरू करताच अचानक जोरदार स्फोट झाला. या स्फोटात लहू गोडे यांच्या हाताला भाजले असून स्फोटाच्या झटक्याने ते बाजूला फेकले गेल्याने सुदैवाने त्यांचा जीव वाचला. या स्फोटामुळे सीताराम गोडे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरातील भांडी फुटली असून किचनमधील फरशा, पोटमाळ्याच्या फरशा तसेच सिमेंटचे पत्रे तुटून खाली कोसळले आहेत. संपूर्ण स्वयंपाकघर उद्ध्वस्त झाले असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. गंभीर बाब म्हणजे, इतका मोठा अपघात होऊनही अद्यापपर्यंत नुकसानग्रस्त घराचा पंचनामा झालेला नाही. गॅस एजन्सीचे प्रतिनिधी, गॅस कंपनीचे अधिकारी तसेच स्थानिक प्रशासनातील ग्रामसेवक व तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली नाही. त्यामुळे पीडित कुटुंब अडचणीत सापडले असून ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संताप आहे. याबाबत माजी सरपंच बबन गोडे यांनी सांगितले की, “गॅस स्फोटात जीवितहानी झाली नसली तरी सीताराम गोडे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना घटनेची माहिती तात्काळ देण्यात आली होती. मात्र, त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे. तत्काळ पंचनामा करून स्फोटाची चौकशी करावी व नुकसानग्रस्त कुटुंबाला शासन व गॅस कंपनीमार्फत योग्य ती नुकसानभरपाई मिळावी.”दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामा, चौकशी व नुकसानभरपाईची कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.