प्रभात वृत्तसेवा जांबूत – संकट काळात मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा शब्द देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरखेड आणि जांबूत येथील बिबट्या हल्ल्यातील पीडित कुटुंबांना दिलेला शब्द खरा केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या रोहन बोंबे, शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव यांच्या कुटुंबीयांना शिवसेना पक्ष निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे. पिंपरखेड परिसरात एका महिन्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शिवन्या बोंबे, रोहन बोंबे तसेच जांबूत येथील भागुबाई जाधव यांना आपला जीव गमवावा लागला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांनी या कुटुंबांना शासनाच्या मदतीबरोबरच वैयक्तिक स्तरावरही आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही मदत देण्यात आली आहे.मदतनिधी सुपूर्द करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. घडलेल्या घटना अतिशय दुर्दैवी असून अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे सांगत त्यांनी कुटुंबाला धीर दिला. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी थेट व्हिडिओ कॉल करून विचारपूस केल्याने पीडित कुटुंबीय भावूक झाले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने आमदार शरद सोनवणे, युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, युवानेते सचिन बांगर, बापूसाहेब शिंदे तसेच शिवसेना पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष तीनही पीडित कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला. दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीतून पाळल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.