प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – शैक्षणिक वर्ष 2024-2025 च्या सेवक संचानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे समायोजन 5 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात यावे, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी पत्र काढले होते. त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात झाली होती. परंतु मुख्याध्यापक महामंडळाने 2025-2026 च्या सेवक संचानुसार समायोजनाचे कार्यवाही करावी अशी मागणी करत लढा उभारला होता, त्याला यश आले आहे. 2024-2025 च्या सेवक संचानुसार महाराष्ट्रातील 600 पेक्षा अधिक माध्यमिक शाळा बंद होणार होत्या. तर या शाळांवरील कार्यरत असणारे 25 हजार हून अधिक शिक्षक अतिरिक्त झाले होते. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार झालेला 2024-2025 चा सेवक संच अन्यायकारक असून शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये काही शाळांची विद्यार्थी संख्या वाढलेली आहे. तसेच शैक्षणिक वर्षाच्या मध्येच समायोजन केले तर या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होणार होता. त्यामुळे 2024-2025 च्या सेवक संचानुसार समायोजनाची प्रक्रिया थांबवावी. 2025-2026 सेवक संच होऊ द्यावा. डोंगराळ व आदिवासी जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्येची अट कमी करावी. अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, शिक्षण संचालक महेश पालकर यांना दिले होते.समायोजनाची प्रक्रिया न थांबवल्यास नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या होणार्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीनुसार शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आदेशानुसार समायोजन प्रक्रिया स्थगितीचे पत्र शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी काढले आहे.शिक्षक समायोजनेचे स्थगितीपत्र काढल्याबद्दल मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सचिव नंदकुमार सागर यांनी आभार मानले आहेत. समायोजन प्रक्रियेमुळे शाळा बंद पडणार होत्या तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते.