प्रभात वृत्तसेवा बारामती – अधिकाऱ्यांसह उद्योजकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आनंद सतीश लोखंडे याच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जळोची, खताळपट्टा आणि झारगडवाडी येथे ईडीने धाड टाकली आहे. त्यामुळं बारामतीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आनंद लोखंडे याने डेअरी व्यवसायात चांगला फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून डेअरीशी संबंधित माल पुरवतो, असे सांगून मुंबईतील काही उद्योजकांची फसवणूक गुन्हे दाखल आहेत. ईडीकडून घरातील कागदपत्रे, आर्थिक व्यवहाराशी निगडीत दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आनंद लोखंडे याच्यावर (दि.३०) एप्रिल रोजी सर्वात पहिला गुन्हा दाखल झाला होता. ज्यामध्ये त्याने एका डेअरी कंपनीची दूध आणि दूधाशी संबंधित उत्पादने पुरवण्याच्या नावाखाली १० कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर काहीच दिवसांत आनंद लोखंडे याच्यासह सतीश लोखंडे, विद्या लोखंडे आणि कुटुंबीयांवरही ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्यालाही १०० कोटींच्या फसवणूकप्रकरणी आनंद लोखंडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आनंद लोखंडे हा आपण आमदार रोहित पवार यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. त्याने आपण या आमदारांचे खास आहोत, त्यांचे सगळं काम पाहतो, असे सांगत अनेकांची फसवणूक केली आहे. त्याने आतापर्यंत अनेकांना वेगवेगळी आमिष दाखवत जवळपास ३०० कोटी रुपयांना गंडा घातल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कोणाची नावे समोर येतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.