प्रभात वृत्तसेवा लाखणगाव – आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर येथे घोडनदीच्या काठालगत लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात सुमारे पाच वर्षे वयाची बिबट्याची मादी पकडण्यात वन विभागाला गुरुवार, दि. १८ रोजी पहाटे यश आले आहे.गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील वाघ, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे आणि रोहिदास सूर्यवंशी यांनी बिबट्याच्या वाढत्या वावराबाबत वारंवार वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या मागणीची दखल घेत मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी घोड नदीच्या बाजूला पिंजरा लावण्यात आला होता. पिंजऱ्यात कोंबड्या आमिष म्हणून ठेवण्यात आल्यामुळे संबंधित बिबट्याची मादी त्यात अडकली. बिबट्या पकडल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सुरक्षितपणे बिबट्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सुलतानपूरसह परिसरातील ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या भागात अजूनही दोन ते तीन बिबट्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुन्हा एकदा या परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी आंबेगाव तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष निखिल हरिचंद्र गाडे पाटील यांनी केली आहे. वन विभागाने सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.