प्रभात वृत्तसेवा मंचर – खेड, आंबेगाव,जुन्नर मार्गाने जाणारी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा मार्ग बदलल्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हा रेल्वे मार्ग पूर्वीच्या मार्गाने होण्यासाठी आपल्या सगळ्यांना लढा देऊन ताकद लावावी लागणार आहे,असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवार, दि.१४ रोजी व्यक्त केले. पुणे–नाशिक रेल्वे मार्गाचा मार्ग अहिल्यानगर हा केल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे नुकसान होणार आहे. या अगोदर झालेल्या सर्वेनुसार आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातून गेलाच पाहिजे. यासाठी निर्णायक भूमिका ठरविण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सरपंच, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संघटना यांची एकत्रित बैठक मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार सभागृहात पार पडली.यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, विवेक वळसे पाटील, निलेश थोरात,सागर काजळे, विष्णू काका हिंगे, संजय गवारी, डॉ.ताराचंद कराळे,आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले, जयसिंग एरंडे, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, अरविंद वळसे पाटील, सुनील बाणखेले, अशोकराव बाजारे, रामशेठ तोडकर,सुरेशराव घुले, जगदीश अभंग, सचिन बांगर, रवींद्र करंजखेले,अंकुशभाऊ लांडे, गोकुळ भालेराव यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले की, सध्याचा मार्ग बदलल्यामुळे तिन्ही तालुके प्रगतीपासून वंचित राहणार आहे. तालुक्याचे मोठे नुकसान झाले असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन त्यांना आपली बाजू समजून सांगू हा मार्ग या भागातूनच कसा फायदेशीर आहे हे पटवून देऊ याबाबत रेल्वेमंत्री यांचीशी देखील चर्चा करू व नंतर पुढची भूमिका ठरवू. असे त्यांनी सांगितले. पाठपुरावा केलेला प्रकल्प दुसरीकडे का गेला? माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, सतत पंधरा वर्षे पाठपुरावा केलेला प्रकल्प दुसऱ्याच ठिकाणावरून जात आहे. याला जबाबदार कोण ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्य व केंद्र सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यास वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारावे लागेल. त्यासाठी आपण सर्वांनी लढा देऊन ताकद लावली तर हा प्रकल्प पूर्वीच्या मार्गाने होईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी सचिन बांगर, रवींद्र करंजखेले इत्यादींची भाषणे झाली. जयसिंग एरंडे यांनी सर्वांचे आभार मानले.