प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर शहरात नववर्ष 2026 चे स्वागत जल्लोषात करण्यात आले. बुधवारी (दि.31) मध्यरात्री लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत आनंदोत्सव साजरा करताना दिसून आले. यानिमित्ताने खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बालजत्रा व खाऊगल्लीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गेल्या पाच वर्षांपासून राजगुरुनगर शहरात सातत्याने राबविण्यात येणार्या या उपक्रमाची यंदा सुरुवात ‘अभिमान महाराष्ट्राचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर व जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, सुरेखाताई मोहिते पाटील, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर, नगरसेवक वैभव घुमटकर, मित्रसेन डोंगरे, सुरेश कौंदरे, अनंत तायडे, अश्विनी पाचारणे, संतोष भांगे, सागर सातकर, पप्पू बनसोडे, अमित घुमटकर, मनीषा टाकळकर, वैभव नाईकरे यांच्यासह शहरातील नागरिक कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालजत्रेमध्ये लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी, विविध खेळ, झोपाळे, मिनी फेरिस व्हील आदी मनोरंजनाची साधने उपलब्ध होती. तर खाऊगल्लीत चॅट, पाणीपुरी, भेळ, वडापाव, आइसक्रीम, कॉर्न, पिझ्झा अशा चटकदार पदार्थांचा नववर्षाच्या पूर्वसंध्येला कुटुंबासह नागरिकांनी मनसोक्त आस्वाद घेतला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या पहिल्या 500 महिलांना मोफत कूपन देण्यात आले. तसेच लकी ड्रॉद्वारे 25 महिलांना आकर्षक पैठण्या माजी आमदार दिलीप मोहिते पाटील व सुरेखाताई मोहिते पाटील यांच्या हस्ते भेट देण्यात आल्या. “खेड तालुका व राजगुरुनगर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. विधी महाविद्यालय सुरू केले असून आज अनेक यशस्वी वकील त्या संस्थेतून घडले आहेत. निवडणुकीत अपयश आले असले तरी आम्ही थांबलेलो नाही. चांगल्या माणसांची संगत आणि समाजोपयोगी उपक्रमातून मिळणारी ऊर्जा हीच आमची ताकद आहे.” – दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार