प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – धानोरे (ता. शिरूर) येथे शॉर्टसर्किटने भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीमध्ये घरातील जीवनावश्यक साहित्यासह महत्त्वाची बँक कागदपत्रे, जमिनीचे दस्तऐवज आणि सैन्य दलात कार्यरत असलेल्या मुलाची शैक्षणिक व सेवाविषयक कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. या घटनेमुळे भोसुरे कुटुंबाचे मोठे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धानोरे येथील राजेंद्र भोसुरे हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांच्या घरात अचानक ट्यूब लाइट फुटून मोठा आवाज झाला. त्यानंतर शॉर्टसर्किटने घराने पेट घेतला. आगीची तीव्रता पाहून शेजारील नागरिकांनी आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील कपाट, कपडे आणि इतर गृहोपयोगी वस्तू जळून भस्मसात झाल्या. या दुर्घटनेत कपाटात ठेवलेले ३५ हजार रुपये रोख आणि सैन्य दलातील भरतीसाठी आवश्यक असलेली मुलाची महत्त्वाची कागदपत्रे पूर्णपणे जळाली आहेत.याप्रकरणी राजेंद्र केरभाऊ भोसुरे (वय ५८, रा. धानोरे, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिसात माहिती दिली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत जळीत बाबतची नोंद केली असून पोलीस हवालदार अमोल चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे भोसुरे कुटुंब उघड्यावर पडले असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.