प्रभात वृत्तसेवा डोर्लेवाडी ( नवनाथ बोरकर ) – मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल (दि.16) जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागतील, याकडे जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आता बारामती तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गण यामधील इच्छुक कार्यकर्ता नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात करतील. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नवीन वर्षातच लागतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांसाठी नवीन वर्ष लाभदायक असणार आहे.गेल्या आठ वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. कोविडचा कालखंड, ओबीसी आरक्षणावरून न्यायालयात गेलेले प्रकरण आदी मुद्दे जिल्हा परिषदेच्या निवडणुका ब्रेक लावणाऱ्या ठरल्या आहेत. त्यातच जिल्हा परिषदेच्या गट- गण आरक्षणात ओबीसींसाठी आरक्षण मर्यादा ओलांडल्याने ही प्रकिया न्यायप्रविष्ठ झाली आहे. त्यानंतर झेडपी निवडणुकीला ब्रेक मिळाला आहे. महापालिकेची निवडणूक, उच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होईल, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. राज्यात महापालिकेचे बिगुल वाजल्यानंतर आता गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांच्या आशा मावळल्या आहेत.बारामती तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. गेल्या आठ वर्षांची प्रतीक्षा संपणार असल्याने सहा गटांतील इच्छुकांनी पायाला भिंगरी बांधून समाजसेवा केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या हायकमांडकडे उमेदवारीसाठी फिल्डींग लावली होती. त्यातच जिल्हा परिषदेच्या गटात ओबीसी आरक्षण जादा झाल्याने हे प्रकरण कोर्टात गेले आहे. त्यामुळे इच्छुकांची गोची झाली आहे.