प्रभात वृत्तसेवा नसरापूर – नसरापूर (ता. भोर) गावाशेजारील हातवे बुद्रुक येथे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गॅस लीकमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुनीता नंदकुमार गुरव यांचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरातील टीव्ही, फ्रिज, सोफा तसेच इतर जीवनावश्यक साहित्य या आगीत नष्ट झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरामध्ये अचानक गॅस लीक झाल्याने आग भडकली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीत खाक झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकानी तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र, परिसरात अग्निशमन दल नसल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास मोठा विलंब झाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच भागातील दीडघर गावातही गॅस लीकमुळे अशाच प्रकारची आग लागली होती. सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडत असल्याने नसरापूर व हातवे बुद्रुक परिसरातील नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला.आगीची माहिती मिळताच भोर तसेच पुण्याहून अग्निशमन वाहनांना पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत घर पूर्णपणे जळून खाक झाले होते. नसरापूर व लगतच्या गावांमध्ये वाढती वस्ती, गॅस सिलेंडरचा वापर आणि वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटना लक्षात घेता, नसरापूर परिसरात कायमस्वरूपी अग्निशमन दल तातडीने उभारण्यात यावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.