प्रभात वृत्तसेवा जुन्नर – जुन्नरमधील जुना बस स्थानकासमोरील ईदगाह मैदानालगत असणाऱ्या एका शेततळ्यात बुडून बहीण – भावाचा शनिवारी (दि. २२) रात्री मृत्यू झाला.आफान अफसर इनामदार (वय १०) व रिफद अफसर इनामदार (वय ७, दोघे रा. खडकवस्ती, जुन्नर) अशी या मृतांची नावे आहेत. शनिवारी दुपारी चारपासून ते घरात नसल्याचे त्यांच्या आईच्या लक्षात आले. परिसरात शोधाशोध करूनही ते न सापडल्याने जुन्नर पोलिसांना माहिती देण्यात आली. ज्या ठिकाणी ही मुले नेहमी खेळायला जायची, त्या परिसरात जुन्नर पोलीस, वन विभाग आणि जुन्नर रेस्क्यू टीमने ड्रोनच्या मदतीने शोध घेतला. तेथे असलेल्या एका शेततळ्याच्या काठावर मुलांचे चप्पल-बूट आणि घसरल्याच्या खुणा दिसल्या. त्यानंतर शेततळ्यात बघितले असता रात्री उशिरा या दोघांचे मृतदेह सापडले. जुन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या तपासणीत त्यांचा पाण्यात बुडून चार तासांपूर्वी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या मुलांचे वडील वेल्डिंगचा व्यवसाय करत असून, ते काही महिन्यांपूर्वी नोकरीसाठी दुबईला गेले आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक किरण अवचर, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढले. जुन्नर पोलीस पुढील तपास करत आहेत.