प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात चासकमान धरणाच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादाने ऐन थंडीतही परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चासकमानचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या श्रेयावरून मानसिंग पाचुंदकर आणि शेखर पाचुंदकर यांच्यात सोशल मीडियावर उघडपणे श्रेयवाद रंगला असून, या वादाला त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनीही आक्रमक स्वरूप दिले आहे. चासकमान धरणाचे पाणी रांजणगाव-कारेगाव गटातील गावांना मिळावे यासाठी नेमके कोणी प्रयत्न केले, कोणाच्या पाठपुराव्यामुळे निर्णय झाला. यावरून दोन्ही नेत्यांच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट, फोटो, व्हिडीओ आणि निवेदनांचा पाऊस पडत आहे. एकमेकांच्या कार्याचा श्रेय घेण्याच्या आरोपांसह टीका-टिप्पणीचा सिलसिला सुरू आहे. काही पोस्टमधून वैयक्तिक पातळीवरही आरोप होत असल्याने वाद चिघळताना दिसत आहे.या श्रेयवादामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, कार्यकर्त्यांमध्येही दोन गट पडल्याचे चित्र आहे. फेसबुक, व्हॉट्सॲपसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून परस्परांवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, पाणीटंचाईचा सामना करणारे शेतकरी व नागरिक मात्र या वादाकडे नाराजीने पाहत आहेत. पाणी मिळणे महत्त्वाचे आहे, श्रेय कोण घेते यापेक्षा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली आहे. चासकमानच्या पाण्यावरून सुरू झालेला हा वाद थांबवून सर्वांनी एकत्र येत पाणीप्रश्नावर ठोस व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. आता या वादावर वरिष्ठ पातळीवरील नेते काय भूमिका घेतात आणि हा वाद कसा शांत होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.