प्रभात वृत्तसेवा मंचर – नाताळ सुट्टीनिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीचा थेट परिणाम वाहतुकीवर झाला असून भीमाशंकरकडे येणाऱ्या वाहनांच्या तब्बल चार ते साडेचार किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण होऊन भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दर्शनासाठी आलेल्या खासगी वाहने, पर्यटकांची वाहने तसेच बस यांची संख्या अचानक वाढल्यामुळे दोन्ही वाहनतळ पूर्णपणे भरले होते.परिणामी अनेक वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्याने वाहतुकीची समस्या अधिकच गंभीर झाली. पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतानाही काही वाहनचालकांनी नियमांचे पालन न करता मध्येच वाहने घातल्याने कोंडी वाढत गेली. वाहनांच्या लांब रांगांमुळे काही भाविकांना वेळेत दर्शन मिळण्यात अडचणी आल्या. मात्र, पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस आणि स्वयंसेवकांनी समन्वयाने काम करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.एकेरी वाहतूक, वाहनांचे टप्प्याटप्प्याने नियोजन आणि वाहनचालकांना मार्गदर्शन करून कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.अशी माहिती मंचर येथील शरद सहकारी बँकेचे संचालक मारुती लोहकरे यांनी दिली. “नाताळ सुटीमुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, मध्येच वाहन घालू नये आणि पोलिसांना सहकार्य केल्यास वाहतूक सुरळीत ठेवणे शक्य होईल,पुढील काही दिवसांतही भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.” -सागर पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक, घोडेगाव पोलीस ठाणे. “नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कुटुंबासह भीमाशंकरला आलो.थंडी जरी असली तरी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यावर मनाला खूप समाधान आणि ऊर्जा मिळते,” दरम्यान, देवस्थान ट्रस्टकडून भाविकांच्या सोयीसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.” – अशोकराव बांगर,बेल्हे, “नाताळ, वर्षाअखेरीस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या वाढली आहे.दर्शन, स्वच्छता, सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेसाठी अतिरिक्त कर्मचारी व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पुढील काही दिवस भीमाशंकरात भाविकांची हीच गर्दी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.” – सुरेशराव कौदरे,अध्यक्ष भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट.