आळंदी – ग्रामपंचायत चऱ्होली खुर्दने मालमत्ता कर आणि इतर कर थकबाकीदारांसाठी एक मोठी सवलत जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि ग्रामसभेच्या ठरावानुसार, ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत सर्व निवासी मालमत्ता कर व इतर थकबाकीच्या वसुलीसाठी 50% सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मूळ थकबाकीपैकी ५०% रक्कम भरणे आवश्यक आहे. या घोषणेनुसार, सन २०२५/२०२६ म्हणजेच चालू वर्षाची पूर्ण कर रक्कम भरल्यावरच मागील थकबाकीवर सवलत मिळेल. तसेच, १ एप्रिल २०२५ पूर्वीची थकबाकी 50% सवलतीसह भरता येणार आहे. ही 50% सवलत फक्त ‘अभियान कालावधीकरिता’ म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लागू असेल आणि चालू वर्षाचा कर आणि मागील थकबाकीचा ५०% कर एक रकमी भरल्यास ती ग्राह्य धरली जाईल. ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बिंदले, सरपंच शालन पांडुरंग पगडे, उपसरपंच रविंद्र ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांच्या स्वाक्षरीने जाहीर आवाहन प्रसिद्ध करण्यात आले आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली कर थकबाकी त्वरित भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.