मंचर : चांडोली खुर्द (ता.आंबेगाव) येथे सौर कृषी वाहिनी प्रकल्प एका बाजूला करावा. या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही मंगळवार दि.१७ रोजी उपोषण चालू ठेवून गावाने मोढा (सर्व व्यवहार) बंद पाळून उपोषणाला पाठिंबा दिला आहे. उपसरपंच अमोल दाभाडे हे उपोषणाला बसले असून या उपोषणाला आंबेगाव तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट देत जाहीर समर्थन दिले आहे. यावेळी प्रशासनाने याबाबत तात्काळ उपाययोजना करावी.अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. चांडोली खुर्द गणेश मंदिराजवळ समस्त ग्रामस्थ चांडोली यांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले असून मंगळवारी दुसऱ्या दिवशी गावातील ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले होते.तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.ताराचंद कराळे, माजी तालुकाध्यक्ष संदीप बाणखेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात,पंचायत समिती सदस्य शिवाजी निघोट, शिवसेनेचे आंबेगाव तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी उपोषण स्थळी भेट देत या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. चांडोली खुर्द गावात सौर कृषी योजना राबवण्यासाठी दोन हेक्टर जागा दिली असतानाही प्रशासनाने परस्पर १२ हेक्टर जागेचा ताबा घेत त्यावर काम सुरू केले आहे. तसेच प्रकल्पाचे काम एका बाजूने करावे. त्या माध्यमातून उर्वरित जागेत भविष्यात गावच्या विकास कामासाठी जागा हवी आहे. विविध शासकीय योजना, विकास कामे राबवण्यासाठी गावाला जागेची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने फक्त दोन हेक्टर जागेचा वापर करावा.उर्वरित जागा गावासाठी ठेवावी.अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचा प्रशासनाने विचार करावा व तात्काळ उपाययोजना करावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.असा इशारा माजी सरपंच बी.टी. बांगर, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष गणपतराव इंदोरे, जिल्हा दूध संघाच्या माजी संचालिका अलका इंदोरे, सरपंच प्रियांका भागीत इंदोरे,मनोहर इंदोरे, राजू बांगर, संदीप वाबळे यांच्या सह ग्रामस्थांनी दिला आहे. आरोग्य तपासणीस नकार उपोषणकर्ते अमोल दाभाडे यांची तब्येत खालवल्याने तपासणी करण्याकरता वैद्यकीय पथक आले होते. परंतु त्यांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे. सौर ऊर्जा सोलर कंपनीने ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे सद्यस्थितीत काम बंद केले असल्याचे सांगण्यात आले.